30 आणि 31 जानेवारी 2021 ला गडचिरोलीत पत्रकारांची भव्य क्रिकेट स्पर्धा
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन अप्पर-डीप्पर व्हाट्सएप ग्रुपचा जनजागृतीपर उपक्रम
गडचिरोली, 9 जानेवारी: स्थानिक जिल्हा प्रेक्षागार मैदानावर 30 आणि 31 जानेवारीला पत्रकारांची भव्य क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘अप्पर-डीप्पर’ या व्हाट्सएप ग्रुपतर्फे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यानुसार यावर्षीदेखील ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यंदाचे स्पर्धेचे चौथे पर्व आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खबरदारी घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याच हेतूने कोरोना निर्मूलन जनजागृतीकरिता स्पर्धेत सहभागी चार संघांची नावे हे कोरोना वलयातीलचं ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मास्क मॅन, सॅनेटायजर्स सुपर, लॉकडाऊन लॉयन्स, कोरंटाइन किंग्ज या चार संघाचा समावेश आहे. या चारही संघाचे मालक, प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार, फिजिओ व खेळाडू अतिशय पारदर्शी प्रक्रियेतून निश्चित झाले आहेत. मनोज देवकुले यांनी लॉकडाऊन लॉयन्स, हेमंत राठी यांनी मास्क मॅन, मल्लिक बुधवानी यांनी सॅनेटायजर्स सुपर, तर बलराम सोमनानी यांनी कोरंटाइन किंग्ज या संघाचे मालकी हक्क विकत घेतले. त्यानुसार जिल्हा प्रेक्षागार मैदानात दैनंदिन सरावसत्र सुरू झाले आहे.
अप्पर-डीप्पर या लोकप्रिय व्हाट्सएप ग्रुपतर्फे गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोलीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीचे हे चौथे पर्व आहे. 30 आणि 31 जानेवारी 2021 या कालावधीत गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम रंगणार आहे. एकूण चार संघ यात सहभागी होणार असून एकंदरीत चार सामने खेळविले जाणार आहेत. 30 जानेवारीला उद्घाटन होणार आहे, तर 31 जानेवारीला सकाळी 9 वाजतापासून प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिला सामना लॉकडाऊन लॉयन्स विरुद्ध मास्क मॅन यांच्यात, तर दुसरा सामना सॅनेटायजर्स सुपर विरुद्ध कोरंटाइन किंग्ज यांच्यात खेळविला जाईल. या दोन सामन्यातील दोन विजेते संघ स्पर्धेच्या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात झुंजनार आहेत. तर पराभूत दोन संघ तिसऱ्या क्रमांकासाठी एकमेकांविरोधात लढत देतील. त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होईल, असा आशावाद स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे संयोजक अनिल तिडके यांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.