‘दारूमुक्त निवडणूक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद
६ तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात
गडचिरोली,दि. १६ जानेवारी: लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी मुक्तीपथ, गाव संघटन व जनतेच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक’ अभियान चालविण्यात आले. यास उत्तम प्रतिसाद देत सहा तालुक्यातील २४५ गावांनी ठराव घेत दारूमुक्त निवडणुकीचा निर्धार केला. यामुळे सहाही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात पार पडली. बहुतांश गावांमध्ये ‘दारूमुक्त निवडणूक’ झाली.
ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी कोणी नोटांचे तर कोणी दारूचे आमिष दाखवून मतदारांना आपल्याकडे खेचून घेतात. दारूबंद किंवा बंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या गावात निवडणुकीदरम्यान काही लोक दारूचे वाटप करतात. निवडणूक निमित्ताने गावात पुन्हा दारू सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूच्या नशेत बुडालेले मतदार पुढील पाच वर्षांसाठी चुकीचा उमेदवार निवडतील. यामुळे दारूमुक्त निवडणुकीचे महत्व गावागावात पटवून देण्यात आले. आरमोरी २८, गडचिरोली ६२, देसाईगंज २६, कुरखेडा ३७, कोरची ४५, धानोरा ४७. या सहाही तालुक्यातील एकूण २४५ गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ठराव घेतला. उमेदवारांकडून मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही. असा वचननामा लिहून घेण्यात आला. आरमोरी तालुक्यातील ३५०, गडचिरोली २४०, देसाईगंज २४५, कुरखेडा ३९५, कोरची १७५, धानोरा २७० अशा एकूण १६७५ उमेदवारांनी संकल्प पत्रावर स्वाक्षरी केली. यामुळे काही ठिकाणी दारूचे वाटप झाले असले तरी बहुतांश गावात दारूमुक्त निवडणूक पार पडली.
आरमोरी तालुक्यातील अधिक गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक झाली. तर काही गावांमध्ये निवडणुकीच्या आदल्यादिवशी दारूचे वाटप झाले असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे किटाळी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या ३० महिलांनी उमेदवारांची बैठक घेऊन दारूचे वाटप करू नका, अन्यथा आम्ही मतदान करणार नाही, असे आवाहन केले होते. त्यानुसार त्या महिलांनी २.३० वाजता दरम्यान मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली तालुक्यातील बहुतांश गावांत दारूमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, एक दोन गावातील दारू विक्रेत्या उमेदवारांना पाडण्यासाठी नागरिक व गाव संघटनेने विशेष प्रयत्न केले आहे. देसाईगंज तालुक्यात शांतीपूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली. कुरखेडा तालुक्यात बहुतांश गावांमध्ये शांतीपूर्ण व दारूमुक्त निवडणूक झाली. धानोरा तालुक्यातील काही ठिकाणी दारूचे वाटप झाले तर काही ठिकाणी दारूमुक्त निवडणूक झाली. विशेष म्हणजे, गावात दारूचे वाटप होऊ नये, यासाठी गावसंघटनांनी पाळत ठेवली होती. कोरची तालुक्यातील बहुतांश उमेदवारांनी वचननाम्यावर स्वाक्षरी केली असल्याने व पोलिसांचा तटस्थ पहारा असल्याने शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या सहाही तालुक्यातील अधिकत्तम गावात दारूमुक्त निवडणूक झाली. यामुळे निश्चितच योग्य उमेदवारांची निवड होणार.
Comments are closed.