आरमोरीत ५७ कोटींच्या अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन — घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा निर्धार
गुणवत्तापूर्ण काम, नागरिकांना त्रास न होणे आणि समन्वयाने जलद प्रगतीचे आवाहन — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा प्रशासनाला स्पष्ट संदेश..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी शहराच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमृत २.० योजनेअंतर्गत ५७ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे भूमिपूजन आज राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी गुणवत्तापूर्ण काम, वेळेवर पूर्णता आणि नागरिकांना त्रास न होईल, यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला मोठा दिलासा
अमृत २.० योजनेतून आरमोरी शहरात ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध नळपाणी पोहोचवले जाणार आहे. यामुळे शहरातील हजारो कुटुंबांना शाश्वत पाणीसंपत्तीचा लाभ होणार आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर आरमोरी शहराची अनेक वर्षांची पाण्याची तूट भरून निघेल, असा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला.
समन्वय आणि शिस्तीनेच विकास – जयस्वाल यांचे प्रतिपादन
“विकासाच्या गतीला वेग द्यायचा असेल तर जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. फक्त योजना मंजूर करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणीही ठरलेल्या वेळेत, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा न होता, कामे पार पडावीत यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे,” असे आवाहन सहपालकमंत्री जयस्वाल यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले, “धावणारे पाणी हळू चालवायला, चालणारे थांबवायला, आणि थांबलेले जिरवायला शिका – पाण्याचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. पाणी हे केवळ गरजेचे नाही, तर भविष्यातील संघर्षाचे कारण ठरू शकते. त्यामुळे आता शहाणपणाने वागण्याची वेळ आली आहे.”
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती व मनोगते
या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते, कृष्णाजी गजबे, महेंद्र ब्राम्हणवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार व आमदारांनी आपल्या मनोगतातून या योजनेंतर्गत पाण्याचे योग्य वितरण, देखभाल आणि नागरिकांचा सहभाग या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले.
योजनेबाबत प्रशासनाची माहिती
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी प्रास्ताविकातून अमृत २.० योजनेची रचना, उद्दिष्टे व अंमलबजावणीसंबंधी सविस्तर माहिती दिली. पाणीपुरवठा व्यवस्था अधिक प्रभावी आणि स्वच्छ कशी करता येईल, यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचा सहभाग आणि अपेक्षा
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नव्या योजनेमुळे पाण्याची टंचाई संपेल, अशी आशा व्यक्त करतानाच नागरिकांनी योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व वेळेत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे आरमोरी शहरात केवळ पाणीपुरवठा सुधारणार नाही, तर शहर विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल, असे बोलले जात आहे.
Comments are closed.