रोह्यातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात: वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रोहा: शहराचा झपाट्याने विकास होत असताना, वाढत्या बांधकामांमुळे आणि औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणामुळे लहान मुलांचे आरोग्य गंभीर संकटात सापडले आहे. शहरातील प्रमुख शाळा जसे की JM राठी स्कूल, पब्लिक स्कूल, मेहंधळे हायस्कूल आणि सितारा स्कूल या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धुळीच्या समस्या अधिक जाणवत आहेत. शाळेत येताना आणि जाताना त्यांना श्वसनाचा त्रास होत असून, सततची सर्दी-खोकला यांसारख्या आजारांनी मुलांचे आरोग्य कमकुवत होत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काम, इमारतींचे बांधकाम आणि गटार खोदण्याची कामे सुरू आहेत. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी माती, रेती आणि सिमेंटचे ढीग कुठेही टाकल्यामुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना सतत धुळीच्या लाटांचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः सितारा शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेस धुळीचा जास्त त्रास होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने पादचाऱ्यांना आणि शाळेतील मुलांना धुळीतून वाट काढावी लागत आहे. बांधकाम करताना नियमानुसार पाणी मारून धूळ कमी करण्याची गरज असते, परंतु ठेकेदारांकडून हे नियम पाळले जात नाहीत. परिणामी, लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ आणि दम्याचे आजार वाढत आहेत.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून सतत रासायनिक वायू सोडले जात असल्यामुळे रोहा शहराच्या हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. पहाटेच्या वेळी शहराच्या वातावरणात धुरकटपणा जाणवतो. हा धूर आणि धूळ यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या फुप्फुसांवर होत असून, काही मुलांना सतत श्वसनाचा त्रास जाणवत आहे.
मुलांचे आरोग्य बिघडल्याने पालक मोठ्या चिंतेत आहेत. एका पालकाने सांगितले की, “आमचे मुलं सतत सर्दी-खोकल्याने आजारी पडतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सतत दवाखान्यात जावे लागते. आम्ही त्यांच्या शिक्षणावर भर देतो, पण त्यांचे आरोग्य बिघडत असेल तर हे भविष्यासाठी मोठे संकट ठरू शकते.”
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वाढते प्रदूषण हे मुलांच्या फुप्फुसांसाठी अत्यंत हानिकारक आहे. धुळीतील अॅडेनोकार्सिनोमा घटक फुप्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. 2022 मध्ये झालेल्या एका जागतिक संशोधनात असे आढळले की, सिगारेट न ओढणाऱ्या 53 ते 70 टक्के रुग्णांमध्ये हे प्रदूषणच कर्करोगाचे मुख्य कारण होते.
पालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे काही ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.
1. बांधकाम स्थळी धूळ कमी करण्यासाठी नियमित पाणी मारणे बंधनकारक करावे.
2. रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी माती, रेती, सिमेंट यांचे अनियमित टाकावे थांबवावे.
3. शाळांच्या परिसरात अधिक झाडे लावून प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
4. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांवर कडक नियंत्रण ठेवून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
रोहा शहरातील वाढते प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, पालकांच्या तक्रारी असूनही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर हे प्रदूषण भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाचे कारण ठरू शकते. त्यामुळे, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
Comments are closed.