“मला फुलांचे बुके नकोत, पुस्तकं घेऊन या. -बिरदेव सिद्धाप्पा ढोणे
कोल्हापूरच्या यमगे गावातील, मेंढपाळाच्या मुलाचा यशस्वी ‘UPSC’ प्रवास — IPS अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर, कोल्हापूर,: सामान्य पार्श्वभूमीवरून येत असतानाही कठोर मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या तरुणाची कहाणी सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात यमगे (ता. शाहूवाडी) येथील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने 551 वा क्रमांक पटकावून भारतीय पोलिस सेवेतील (IPS) उमेदवारी मिळवली आहे.
गुराखी काम करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या बिरदेवने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत UPSC सारख्या देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे. त्याचा संघर्षमय प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बिरदेवच्या यशानंतर त्याला शुभेच्छा देण्यासाठी गावात व परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोक भेटीस येत आहेत. मात्र त्याने केलेले एक आवाहन सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. “मला फुलांचे बुके नकोत, पुस्तकं घेऊन या. ही पुस्तकं गावात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लायब्ररीसाठी वापरता येतील,” असं म्हणत त्याने आपल्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवलं आहे.
बिरदेवच्या या विचारशील कृतीचं सर्वत्र कौतुक होत असून, ही लायब्ररी भविष्यात अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.