आत्महत्येसाठी परवानगी देत नसाल तर नक्षलवादी बनणार, शैक्षणिक कर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश झालेल्या वैभवने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
- आत्महत्येस परवानगी देत नसाल तर मी एक वर्षात उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखवेन आणि अशा बोगस सिस्टमचं कंबरडं माझ्या पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न करेन, अस त्यांने पत्रात लिहिलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. २६ डिसेंबर: “शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करायची परवानगी द्या, अन्यथा नक्षलवादी बनून दाखवेन,” असा मजकूर असलेलं पत्र बुलढाण्याच्या आदिवासी भागातील एका फार्मसीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. विद्यार्थ्यांने नक्षली बनण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैभव बाबाराव मानखैर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहतो. वडिलांनी शेतीसाठी घेतलेलं पीककर्ज फेडलं नाही म्हणून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या वैभवला बँकेने कर्ज नाकारलं. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश झालेल्या वैभवने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. आत्महत्येस परवानगी देत नसाल तर मी एक वर्षात उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखवेन आणि अशा बोगस सिस्टमचं कंबरडं माझ्या पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न करेन, अस त्यांने पत्रात लिहिलं आहे.
वैभवचे वडील बाबाराव मानखैर हे शेतकरी आहे. त्यांना दोन मुलं मोठा प्रसाद आणि धाकटा वैभव. प्रसाद शेतीत वडिलांना मदत करतो. तर वैभव बारावीनंतर धुळे जिल्ह्यातील बोराडीमधील फार्मसी कॉलेजमध्ये बी.फार्मसीच्या दुसऱ्या वर्गात शिकतो. बारावीनंतर जवळ असेलल्या पैसे वापरुन बाबाराव मानखैर यांनी वैभवला फार्मसीच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पहिल्या वर्षी वैभवला चांगले गुणही पडले. पण यंदा शेतात काहीच पिकलं नाही. पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षातच वैभवचं शिक्षण थांबण्याची वेळ आली. परिणामी वैभवने संग्रामपूर इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यांपूर्वी मोठ्या अपक्षेने अर्ज केला होता. चार महिन्यात अनेकदा बँकेच्या पायऱ्या झिजवल्या. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वैभव हतबल झाला होता. आज नाही तर उद्या आपलं शैक्षणिक कर्ज मंजूर होऊन पुन्हा कॉलेजला जाऊ या आशेने तो वाट पाहत होता. मात्र तुमच्या वडिलांनी घेतलेल पीक कर्ज न भरल्याने शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही, असं कारण असलेलं रिजेक्शन लेटर वैभवच्या हाती दिलं.
पुढील शिक्षणाचं स्वप्न भंग झाल्याने वैभवने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आत्महत्येची परवानगी मागितली आहे. जर आत्महत्येची परवानगी देत नसाल तर नक्षलवादी बनण्याची धमकीही त्याने या पत्रात दिली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक कारणाने शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आज सुट्टी असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. पण अमरावती इथल्या एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की, “फक्त कर्ज नामंजूर झालंय हे सांगण्यासाठी बँकेला चार महिने का लागले? यात विद्यार्थ्याचा वेळ वाया गेला. तो दुसऱ्या बँकेकडे कर्ज मागू शकला असता. जरी बँकेला हा विद्यार्थी होतकरु दिसला नाही तरीही या विद्यार्थ्याने फार्मसीच्या पहिल्या वर्षात चांगले मार्क्स मिळवले आहेत. या मुलाच्या वडिलांनी पीक कर्ज जरी भरलं नाही तरी हा विद्यार्थी शिक्षण घेतल्यावर ते भरु शकला असता. पण बँकेने जे ठरवलं ते त्यांच्या दृष्टीने योग्यही असेल.”
Comments are closed.