लसीकरण मोहिमेची अंमलबजावणीसाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश.
कोरोना लसीकरण अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज घेतला आढावा.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, कोरोना योद्धा व 50 वर्षावरील नागरिकांचा समावेश.
चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : कोविड-19 विषाणुवर पुढील कालावधीत शासनाने प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिल्यास त्याअनुषंगाने जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविण्यासंबंधी पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीसकलमी सभागृहात जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक आज घेण्यात आली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय रुगणालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत,आयएमए चे डॉ. मंगेश गुलवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कोराना लसची ग्रामीण स्तरापर्यंत वाहतुक व साठा करण्याबाबत सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती करून घेतली. जिल्ह्यात सद्या एकाचवेळी इतर लसीव्यतिरिक्त कोविडच्या दोन लाख लसींचा साठा करण्याच्या क्षमतेवर त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र ग्रामीण भागापर्यंत विहित तापमान मर्यादेत लस पोहचविण्यासाठी वाहतुक सुविधा अद्यावत करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे व आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिले.
सदर लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, कोरोना योद्धा व 50 वर्षावरील नागरिकांचा समावेश करण्याबाबत शासनाचे निर्देश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे डॉ. संदिप गेडाम यांनी लसीचे स्टोअरेज उपलब्धतेबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीला आरोग्य विभागाचे डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर, डॉ. प्रीती राजगोपाल, डॉ. प्रकाश साठे, डॉ. अविष्कार खंडारे, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, संग्राम शिंदे, गणेश धोटे व विविध विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments are closed.