राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई डेस्क, दि. १८ जानेवारी: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपांमुळं त्यांच्यापुढील अडचणी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे, या प्रकरणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत आहे. राष्ट्रवादीनं तुर्तास मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसून, चौकशीच्या आधारेच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं.
तिथं विरोधकांनी मुंडेंवर तोफ डागत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीच मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हेसुद्धा मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पण, याच भूमिकेसाठी त्यांना आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकावलं जाण्याचं सत्र सुरु असल्याचं कळत आहे.
खुद्द सोमय्या यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्याला नेमकं कोण धमकी देत आहे, त्यांची नावंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केली आहेत. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांच्याकडून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दोन दिवसांत आपल्याला सहा वेळा धमक्यांचे फोन आले असून, यामध्ये थेट “सर्व 6 बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या “,अशा शब्दांत आपल्याला धमकावण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर, पोलिसांत याबाबतची माहिती देऊनही पोलीस यंत्रणांनी याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं म्हणत त्यांनी पोलीस यंत्रणांवर गंभीर आरोप केला.
रेणू शर्मा नामक महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले. ज्यानंतर हे प्रकरण आणखी धुमसताना दिसलं. राष्ट्रवादीचे नेते आमि महाविकासआघाडीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचितही केली. ज्यामध्ये या महिलेने पुन्हा मुंडेंवर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून मधली काही वर्ष सोडली तर माझा वापर केला आहे. या दरम्यान त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला होता.
Comments are closed.