Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा तीव्र करू – भाई रामदास जराते

गडचिरोलीत शेतकरी कामगार पक्षाचं ठिय्या आंदोलन; पाच हजार मासिक पेन्शनसह विविध मागण्यांचा पाढा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शासनाच्या निराधार योजनांबाबतचा असंवेदनशील आणि ढिसाळ कारभार, शेकडो लाभार्थ्यांना वेळेवर मिळणाऱ्या निधीचा खोळंबा, आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प आर्थिक सहकार्य याविरोधात आज गडचिरोली शहरातील तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई रामदास जराते यांनी केलं.

सरकारकडून दुर्लक्ष; लोकशाहीचा संकोच – भाई जराते यांचा इशारा

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भाई रामदास जराते यांनी आंदोलनाला संबोधित करताना सरकारवर घणाघाती टीका केली. “वयोवृद्ध, विधवा, परितक्त्या, निराधार आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना दिलासा देणाऱ्या योजना या सरकारच्या अजेंड्यावर नाहीत. शासन यंत्रणा केवळ आकडेवारीत आणि जाहिरातबाजीत अडकलेली आहे. या अन्यायाविरोधात आम्ही लढा उभारणार आणि संपूर्ण राज्यभर चळवळ उभी करणार,” असा इशारा त्यांनी दिला.

विविध मागण्या : पाच हजार मासिक पेन्शन, शेतकऱ्यांसाठी बोनस, अतिक्रमणधारकांना पट्टे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षासह डाव्या पक्षांचे प्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, तसेच शेकडो निराधार महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या:

सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. मागील सहा महिन्यांपासून रखडलेली रक्कम तातडीने वितरित करण्यात यावी. रोजगार हमी योजनेची मजुरी वेळेवर द्यावी.पंतप्रधान किसान सन्मान निधीचे अनुदान आणि धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.

शासकीय जागांवर राहणाऱ्या संघर्षनगर, शाहूनगर, इंदिरानगर आदी भागांतील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ आणि कायमस्वरूपी पट्टे द्यावेत.

डावे पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबा…

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्रीताई जराते, गुरूदास सेमस्कर, गोविंदा बाबणवाडे, रामदास आलाम, डंबाजी भोयर, चंद्रकांत भोयर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

प्रशासनाची भूमिका..

तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार हलमारे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्विकारले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे योगाजी चापले, देवेंद्र भोयर, छाया भोयर, भास्कर ठाकरे, रजनी खैरे यांच्यासह आझाद समाज पक्षाचे सतिश दुर्गमवार आणि अनेक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments are closed.