शेतकऱ्यांचे दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.१२ नोव्हे : निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.
जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून २९४ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.
गेल्याच आठवड्यात यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवून परवानगी मिळवली होती.
जिल्हा प्रशासनाकडून बँकांना मदतनिधीचे लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित खातेदारांच्या खात्यात पैसे शनिवारपर्यंत जमा होतील, असे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed.