महाडमध्ये महेंद्र फायनान्सचा आर्थिक छळ – गरीब ग्राहकांची लूट, लोन आणि NOC च्या नावाखाली अवैध वसुली!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रोहा: देशातील वित्तीय संस्थांना ग्राहकांचे हित जपण्याची जबाबदारी असते, मात्र महाडमधील महेंद्र फायनान्स शाखा ग्राहकांची पिळवणूक करण्याच्या आरोपांनी गाजत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिक मदतीच्या नावाखाली फसवून त्यांच्याकडून अनावश्यक शुल्क वसूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परसुराम चौहान या ग्राहकाने थेट आरोप करत महेंद्र फायनान्सच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला आहे.
परसुराम चौहान यांनी सरकारी बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला असूनही, त्याला वित्तीय संस्थेने नकार दिला. त्याचे मुख्य कारण म्हणजे महेंद्र फायनान्सने त्यांच्या सिव्हिल स्कोअरवर चुकीची नोंद करून तो खराब केल्याचा आरोप आहे. चौहान यांनी याबाबत माहिती घेतल्यावर महेंद्र फायनान्सचाच यात हात असल्याचे स्पष्ट झाले.
महेंद्र फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फिटल्यानंतरही ग्राहकांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) देण्यात येत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात आहेत. MH06BU3009 या वाहनासाठी हप्ता पूर्ण झाल्यावरही NOC साठी ३०,००० रुपये घेतले, पण NOC अद्याप मिळाले नाही MH06BW2152 या वाहनासाठी पेनल्टीच्या नावाखाली ४२,००० रुपये घेतले, पण NOC देण्यात आले नाही!
हे प्रकार म्हणजे सरळसरळ आर्थिक शोषण असून महेंद्र फायनान्सच्या व्यवस्थापक विनोद संकपाळ याच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महेंद्र फायनान्स गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिक जाळ्यात अडकवून त्यांची लूट करत असल्याचे हे प्रकार सिद्ध करतात. लोन घेताना दिलेल्या अटींची पूर्तता करूनही ग्राहकांना अनावश्यक शुल्क आकारले जात आहे. हा प्रकार फक्त एकाच ग्राहकासोबत नाही, तर अनेक नागरिकांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत.
महेंद्र फायनान्सच्या या बेकायदेशीर आर्थिक छळाला आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. जर ही स्थिती अशीच राहिली, तर भविष्यात गरीब नागरिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परसुराम चौहान यांनी गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना महेंद्र फायनान्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, महेंद्र फायनान्ससारख्या संस्थांनी आर्थिक गरजांचा गैरफायदा घेत नागरिकांना लुबाडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ग्राहकांनी लोन घेण्यापूर्वी आणि हप्ता फिटल्यानंतर NOC मिळत असल्याची खात्री करूनच व्यवहार करावा.
महेंद्र फायनान्सच्या या लुटमारीच्या प्रकारावर तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता ग्राहकांतून होत आहे.
Comments are closed.