गडचिरोलीत मोठी कारवाई: पाच जहाल माओवादी पोलिसांच्या तावडीत, सात हत्यारं जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 20 मे : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवायांना आळा बसविण्याच्या दृष्टीने मोठं यश मिळवताना जिल्हा पोलिस व सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) च्या संयुक्त कारवाईत पाच जहाल माओवादी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. यामध्ये एक डिव्हिजनल कमिटी सदस्य (DVCM), एक एरिया कमिटी सदस्य (ACM) आणि तीन प्लाटून सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण सात हत्यारं आणि तीन वॉकीटॉकी संच जप्त करण्यात आले आहेत. या पाचही माओवादी कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलीस उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील बिनागुंडा (अबुझमाड) जंगल परिसरात सुमारे 50-60 माओवादी घातपाताच्या तयारीत जमल्याची माहिती मिळाल्यानंतर 18 मे रोजी सि-60 कमांडोज आणि सीआरपीएफच्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी 19 मे रोजी सकाळी बिनागुंडा गावात सघन घेराबंदी करताना गावात काही हत्यारबंद संशयित माओवादी दिसून आले. गावात सामान्य नागरिकही उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी गोळीबार टाळत शिताफीने पाच माओवाद्यांना जिवंत ताब्यात घेतलं, तर अन्य माओवादी जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची ओळख पुढीलप्रमाणे आहे:
1. उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली – DVCM, प्लाटून क्र. 32, वय 28, रा. पल्ली, भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.)
2. पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी – ACM, प्लाटून क्र. 32, वय 19, रा. कोंचल, आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.)
3. देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता – प्लाटून सदस्य, वय 19, रा. मारोट बाकापंचायत, आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.)
4. दोन अन्य अल्पवयीन माओवादी – वय निश्चित न झाल्याने बाल न्याय मंडळासमोर सादर
या कारवाईत एक SLR रायफल, एक .303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन भरमार बंदुका, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज आणि वॉकीटॉकी संचही जप्त करण्यात आले आहेत.
बक्षिसाच्या घोषणाही ठळक
ताब्यात घेतलेल्या माओवादी कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र शासनाकडून खालीलप्रमाणे बक्षीस जाहीर होतं:
सुमली – 16 लाख रुपये
बंडी – 08 लाख रुपये
सबिता – 04 लाख रुपये
दोन अन्य माओवादी – एकूण 08 लाख रुपये
अभियानाच्या पुढील टप्प्यात अधिक तीव्र कारवाईचे संकेत
या कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांच्यासह गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करत, माओवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
Comments are closed.