डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार – आ. चंद्राकांतदादा पाटील
आ. चंद्राकांतदादा पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. 2 फेब्रुवारी: पुणेकरांसाठी 2021 हे वर्ष अतिशय सुखकारक ठरणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत पाच मार्गांवर मेट्रो धावणार आहे. तर मार्च मधे ट्रायल रन सुरु होतील व वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर ऑगस्ट पर्यंत मेट्रो धावेल, असा विश्वास पुणे मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर शहरातील विकासकामांचा आ. चंद्राकांतदादा पाटील आढावा घेत असून, आज त्यांनी पुणे शहर मेट्रो प्राधिकरणासोबत बैठक घेऊन मेट्रोच्या कामाची सविस्तर माहिती घेतली.

या बैठकीला महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, आ. मुक्ताताई टिळक, सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे सर्व आधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्री पाटील म्हणाले की, पुणे मेट्रोबाबत अतिशय समाधानकारक चित्र असून, पाच टप्पे डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करुन त्यावर मेट्रो धावू शकेल, तर त्यातील एक मार्गावर मार्चपासून मेट्रो धावू शकेल, असा मेट्रो अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्याशिवाय कोथरुडमधील नळस्टॉप चौकातील डबल डेकर उड्डाणपूलाचे कामही अतिशय वेगाने सुरु असून,जून 2021 पर्यंत तो पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, असाही दावा मेट्रो प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे मेट्रो आणि उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यास पुण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल असा विश्वास आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.पुणेकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असेही ते म्हणाले.
Comments are closed.