Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संवेदनशील पिढी निर्मितीसाठी राष्ट्रीय शिक्षण आवश्यक- अभिनेता सुबोध भावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, 31 जुलै :-  पैसा, स्वार्थ आणि वैयक्तिक करिअरच्या पलिकडे देशाचा व समाजाचा विचार करणारी, ज्ञानी, स्वत: आनंद मिळविणारी आणि समाजाला आनंद देणारी संवेदनशील पिढी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले. डीईएस पूर्व प्राथमिक शाळेने ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भावे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, नाट्य संस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी, डॉ. राहुल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भावे म्हणाले, ‘शिवजयंती व गणेशोत्सवाच्या माध्यमांतून लोकमान्य टिळकांनी येणाऱ्या पुढच्या पिढीशी परंपरेची नाळ जोडण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांना सर्व राष्ट्रपुरुषांची ओळख करून देऊन हे कार्य पुढे नेणे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शिक्षण आहे. पुष्पाच्या डॉयलॉगने मुलांच्या आयुष्यात क्रांती होणार नाही. परंतु राष्ट्रीय पुरुषांचे विचार समाजात अंगिकारले जातील. टिळक आणि समकालिन नेत्यांनी नेहमी राष्ट्राचा विचार केला. स्वातंत्र्यानंतर देशाची रचना कशी असेल याची स्वप्ने पाहिली. म्हणून ती अंमलात आली. आजच्या पिढीने देश उभारण्याच्या कार्याचा विचार केला पाहिजे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुंटे म्हणाले, ‘शिक्षणामुळे संपूर्ण जीवनावर संस्कार होतो. स्वातंत्र्याबरोबर संस्कृती आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय शिक्षण आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याचे महत्त्व मोठे आहे. टिळकांचा राष्ट्रीय शिक्षणाचे विचार डीईएस पुढे नेत आहे.’

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिववंदना, १८५७ चे स्वातंत्र्य समर, टिळकांचा जन्म, शालेय-महाविद्यालयीन जीवनातील गोष्टी, क्रांतिकारकांना मार्गदर्शन, रॅंडचा वध, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, केसरी-मराठा वर्तमानपत्र, सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात, स्वामी विवेकानंदांशी भेट, विदेशी कपड्यांची होळी, लाल-बाल-पाल युग आदी ऐतिहासिक प्रसंग सादर करण्यात आले. अभिषेक खेडकर यांनी निवेदन केले. मुख्याध्यापिका बर्वे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सोनाली साठे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. तारका निरंतर यांनी परिचय करून दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-  

Comments are closed.