Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीच्या प्रश्‍नांवर दुर्लक्ष : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना खुली मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा कार्यभार स्वतःकडे घेतल्याचे मोठ्या थाटात जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना जिल्ह्याला वेळ देण्यास फुरसत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसने आज केले. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे देखील जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत असल्याने, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिन्यातून किमान दोन दिवस गडचिरोलीसाठी राखून ठेवावेत, अशी ठाम मागणी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने मोठे प्रकल्प साकारले जात असून हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे आश्वासने दिली जात आहेत. मात्र या औद्योगिक गदारोळाच्या आड जिल्ह्याचे मूलभूत प्रश्न ढासळलेल्या अवस्थेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात रानटी हत्तींनी थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. धान खरेदीचे पैसे आणि बोनस अद्यापही वितरित झालेले नाहीत. वाळू धोरण अंमलात आणले गेलेले नाही, परिणामी घरकुल योजना अडकली आहे. कंत्राटदारांचे बिले प्रलंबित असल्याने अनेक विकास कामे थांबलेली आहेत.

याशिवाय विमानतळ आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक शेती संपादित केली जात असून हे सर्व शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध होत आहे. शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. स्थानिकांना नोकरी मिळेल असे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात रोजगार बाहेरून आलेल्यांनाच मिळत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागात नियमित वीजपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. मनरेगाच्या कोट्यवधींच्या देयकांची थकबाकी आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.

या साऱ्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री व सहपालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असून, केवळ ‘उद्योग विकास’ या घोषणेवर जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास होणार नसल्याचा काँग्रेसचा ठाम दावा आहे. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे की, त्यांनी जर जिल्ह्यासाठी महिन्यातून किमान दोन दिवस वेळ दिला नाही, तर जिल्हाभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल.

ही पत्रकार परिषद खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सतीश विधाते आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

सकाळी भूमिपूजन, दुपारी निषेध : एकाच दिवशी राजकीय रंगत…

१५ मे रोजी आरमोरी येथे अमृत योजना २.० अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते, कृष्णाजी गजबे आणि महेंद्र ब्राह्मणवाडे आदी उपस्थित होते.

५७ कोटी रुपयांच्या या योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकून घराघरांत शुद्ध नळपाणी पोहोचविण्याचा मानस आहे. सकाळी सर्वच नेते एका मंचावर एकत्र दिसले, परंतु काही तासांतच काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केल्यामुळे गडचिरोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

Comments are closed.