गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने दिवंगत कर्मचारी स्व. नरेश कोहचाडे यांच्या परिवारास अर्थसहाय्य
गडचिरोली, दि. २५ फेब्रुवारी: गोंडवाना विद्यापीठाचे निम्न श्रेणी लिपीक स्व. नरेश यादव कोहचाडे यांचे कृषी महाविद्यालयापुढे अपघात झालेले होते. उपचाराकरीता नागपूर येथे हलवित असतांना दि. ०१/०७/२०२० रोजी प्रवासात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. नरेश कोहचाडे यांच्या पश्चात पत्नी, आई व तीन वर्षाची मुलगी आहे. कोहचाडे यांच्या पत्नी वनमाला कोहचाडे यांनी परिवाराच्या उदरनिर्वाहाकरीता मदत म्हणून विद्यापीठाकडून अर्थसहाय्याची मागणी केलेली होती.
मागणीच्या अनुषंगाने दि. २७ जानेवारी, २०२१ रोजी संपन्न झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठात कार्यरत कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना रू. २,००,०००/- विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी कल्याण निधी मधून अर्थसहाय्य स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भविष्यात अशा प्रकारची मदत कर्मचाऱ्यांना मिळण्याकरीता विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात स्वतंत्ररित्या तरतुद करण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्या अंतर्गत स्व. नरेश कोहचाडे यांचे कायदेशीर वारसदार त्यांच्या पत्नी वनमाला
कोहचाडे यांना दि. २४/०२/२०२१ रोजी आयोजीत व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते. रू. २ लक्ष अर्थसहाय्याचा धनादेश वितरीत करण्यात आला.
प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजु मुनघाटे, डॉ. प्रमोद काटकर, पराग धनकर, डॉ. विनायक शिंदे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, वित्त व लेखा अधिकारी मुकुंद भांबेरे, उपकुलसचिव डॉ. विजय सिलारे, सहा. कुलसचिव डॉ. कामाजी देशमुख तसेच कर्मचारी संघटनेचे सचिव सतिश पडोळे उपस्थित होते. कुलगुरू यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणजे विद्यापीठाचा कणा असून विद्यापीठाच्या विकासाचा महत्वपुर्ण घटक आहे. कोहचाडे यांचे अचानक मृत्यु होणे अतिशय दुर्दैवी असून त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही अशा शब्दात सहानुभूती व्यक्त केली. विद्यापीठ प्रशासन कोहचाडे परिवाराच्या दुखात सहभागी असून शासनाकडून देय असलेले सर्व लाभ कोहचाडे यांच्या परिवारास मिळवून देण्यात येतील असे आश्वासन मा. कुलगुरू महोदयांनी कोहचाडे यांच्या परिवारास दिले.
दिवंगत कर्मचारी यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराचा सहानुभूतीपुर्वक विचार करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाचे गोंडवाना विद्यापीट कर्मचारी संघटना स्वागत करीत असून संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांनी विद्यापीठ प्रशासनाचे व व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त केले.
Comments are closed.