नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
अमरावती, 31 डिसेंबर: नवीन वर्षाला माझे काही वेगळे संकल्प नाही. नवीन वर्षात महाराष्ट्रावरची, देशावरची संकटे दूर व्हावीत. शेतकऱ्यांचे नव वर्ष सुखा समाधानाचे जावे. तसेच राज्यात जे सरकार आहे, त्या सरकारला नवीन वर्षामध्ये सुबुद्धी मिळावी आणि चांगले काम करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी इतकीच अपेक्षा असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
खासदार नवनीत राणा यांनी शाहिद सैनिक व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस अमरावती शासकीय विश्राम भवन येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, आपल्याकडे अलीकडच्या काळात फार संकुचित विचार चालला आहे. कुठला आमदार एखाद्या व्यक्तीला भेटला तर तो त्या पक्षात जाणार, कोणी कोणाची भेट घेतली की तो व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जाणार, किंवा कोणी कार्यक्रमात आले की ते आता एकत्रित येणार, अशी चर्चा होते. माध्यमांना विनंती आहे की, त्यांनी संकुचित विचार सगळे सोडावे. कोणी कुठे जात नाही. आम्हाला सत्तेत यायचे तेव्हा आमच्या भरवशावर आम्ही सत्तेत येऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुनील देशमुख, आमदर रवी राणा, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Comments are closed.