लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगावला परसबाग स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव ही नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी परिचित असून नुकत्याच झालेल्या प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेत धानोरा तालुक्यातून अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेने विद्यार्थी कौशल्य उपक्रमातून परसबाग निर्मिती करीत असताना, विविध प्रकारच्या पालेभाज्या त्यामध्ये मेथी, पालक, सांबार, कोबी, भेंडी, वांगी, चवळीच्या शेंगा, गवार, मुळा, काकडी, कारले यांचा समावेश आहे. ही सर्व पिके सेंद्रिय खताच्या साह्याने, अल्प पाण्याच्या वापराने आणि शाश्वत पद्धतीने पिकविली आहेत. सोबतच भाजीपाल्याची निगा कशी राखावी, त्यांना रोग किंवा कीड लागू नये, म्हणून काय करता येईल, याचे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
परसबागेतील पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात केल्यानंतर उर्वरित भाजीपाला गावात विकला जात आहे. यातून त्यांना व्यवहार ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली आहे. परसबागेवर निगराणीकरिता सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या परसबागेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्याध्यापक रमेश काळबांडे, शिक्षक देवेंद्र लांजेवार, शालेय परसबाग प्रमुख संतोष कोल्हे, शिक्षिका तलवारवार, वर्षा नाकाडे व उषा बोरकर यांच्या मार्गदर्शनात परसबाग फुलली आहे.
हे पण पहा,
Comments are closed.