पाथरगोटा गावाचा ग्रामपंचायत निवडणूकिवर बहिष्कार
- गावातुन एकही मतदान नाही
- मतदान केंद्र फक्त नावापुरते
- शासन मात्र अजूनही गावकर्यांच्या प्रश्नावर उदासीन
आरमोरी, दि.१५ जानेवारी: आरमोरी तालुक्यापासून १० किमी अंतरावर असलेल्या पाथरगोटा गावाने आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर कडकडीत बहिष्कार केला असून कुणीही उमेदवार निवडणुकीत उभे न करता कुणीही मतदान करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
मागील ३० वर्षांपासून पाथरगोटा गावाची अनेक मागण्या धरून गट ग्रामपंचायत असलेल्या पळसगाव गट ग्रामपंचायत पासून वेगळी ग्रामपंचायत निर्मिती मागणी अनेक वर्षापासून जोर धरून आहे. गावकऱ्यांनी अनेक आंदोलन व निवेदनातून शासनाला ग्रामपंचायत वेगळी करण्याची मागणी केली, ग्रामसभातून अनेक निवेदन शासन स्तरावर पाठविण्यात आले मात्र अजून ३० वर्षांपासून ग्रामपंचायत वेगळा करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी लालफिती मध्ये धूळखात पडला आहे.
मागील लोकसभा, विधानसभा आणि लॉकडाऊन अगोदर जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांचेकडे सदर निवेदनातुन ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी मागणी केली होती आणि याही अगोदर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला, मात्र शासन व प्रशासन या गंभीर बाबीकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
पाथरगोटा गावाची लोकसंख्या १७०० च्या घरात असून ग्रामपंचात पळसगाव पेक्षा गावाची लोकसंख्या जास्त आहे. मात्र असे असूनही ग्रामपंचात पेसा अंतर्गत येत असल्याने बहुसंख्य इतर मागास वर्गीय मतदार असतांना सरपंच पदासाठी नेहमीच मुकत आलेला आहे. यामुळे सरपंच आणि इतर सदस्य हे पळसगाव येथील असल्याने ग्रामपंचायत मध्ये फक्त पळसगावाची हुकूमशाही चालत असल्याने शासन स्तरावरील आले संपूर्ण विकास निधी हा पळसगावात खर्च होत असून, पाथरगोटा गाव विकासकामापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे.
गावात कित्तेक वर्षांपासून पिण्याचे शुद्ध पाणी, नाली, रस्ते, घरकुल, शेततळे, आरोग्य, स्मशानभूमीचे प्रश्न आ-वासून पाहत आहेत, मात्र शासनाने या गंभीर बाबीची कुठलीही दखल न घेता गावकऱ्यांशी फक्त आश्वासनाने तोंडाला पाने पुसली आहेत.
या सर्व बाबीवर शासनाने दखल घेण्यासाठी गावकर्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला असून या नंतरही शासनाने दखल न दिल्यास सर्व गावकरी जिल्हाधिकारी यांचे समोर आमरण उपोषण करतील असा इशारा दिला आहे.
Comments are closed.