नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्ये प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले. ग्रामस्तरावरील सूक्ष्म नियोजन व त्यानुसार आराखडे तयार करून BSRF संस्थेच्या मदतीने प्रत्येक गावात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने मृदा व जलसंधारण कामे या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आज रोजी आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यकारी समन्वयक डॉ. किशोर झाडे, आणि कृषी अधिकारी भाऊसाहेब लवांड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मृदा व जलसंधारण तंत्रज्ञानाचा शाश्वत शेतीसाठी उपयोग
प्रशिक्षणात डॉ. किशोर झाडे यांनी मृदा व जलसंधारण कामांमधून शाश्वत शेतीच्या दृष्टीने फायदे विशद करताना फळबाग लागवडीच्या संधींबद्दल माहिती दिली. आंबा, चिकू, नारळ यांसारख्या फळझाडांची बांधावर लागवड व भात पिकानंतर कापूस, तुर, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्नात वाढ कशी साधता येईल, हे त्यांनी स्पष्ट केले.
भाऊसाहेब लवांड यांनी मृदा व जलसंधारणातील वाहीती व बिगर वाहीती क्षेत्रावरील उपचार, ओघडी व नाल्यावर होणाऱ्या कामांबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गाला श्रीमती मधुगंधा जुलमे, कृषी उपसंचालक; महेश परांजपे (वडसा), आनंद गंजेवार (अहेरी), धर्मेंद्र गिर्हेपुंजे (गडचिरोली) – उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक/सेवक उपस्थित होते.
Comments are closed.