“ध्वजाचा अभिमान, बलिदानाचा सन्मान!”
३७ वी वाहिनी CRPF चा स्थापना दिवस प्रेरणादायी साजरा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १ जुलै २०२५ : अदृश्य सीमेवरील अपार शौर्य, निःस्वार्थ सेवेचा धगधगता व्रत आणि राष्ट्रभक्तीचा झंझावात… याच तेजस्वी परंपरेचा वारसा लाभलेल्या ३७ वी वाहिनी, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चा स्थापना दिवस आज अत्यंत शिस्तबद्ध आणि राष्ट्रनिष्ठ वातावरणात साजरा करण्यात आला.
सन १९६८ पासून सुरू झालेल्या या वैभवशाली पर्वाचा आज सुवर्णस्पर्शी पुनःस्मरण झाला. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर प्रत्येक जवानाच्या रक्तातील तिरंग्याप्रती असलेल्या निष्ठेचा, प्रत्येक शहीदाच्या हृदयातून झरलेल्या अंतिम श्वासाचा आणि प्रत्येक आईच्या उदरात घडणाऱ्या धैर्यगाथेचा सन्मान होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाहिनीचे कमांडंट श्री डी. ई. किंडो होते. यावेळी द्वितीय कमान अधिकारी श्री सुजीत कुमार, उपकमांडंट श्री अनिल चंद्रमोरे तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वरुण मिश्रा उपस्थित होते.
स्थापना दिवसाच्या औचित्याने, सर्वप्रथम शहीद जवानांना कृतज्ञ श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद स्मारकावर अर्पण करण्यात आलेली पुष्पांजली, केवळ फुलांचा नव्हे, तर वाहिनीच्या प्रत्येक सदस्याच्या अंतःकरणातील आदराचा साक्षात्कार होता. त्या स्मरणचिन्हाजवळ क्षणभर सगळं स्थिरावल्यागत झालं… जणू संपूर्ण गडचिरोलीच्या जंगलात एक शांत आदरभाव उसळून गेला.
त्यानंतर आयोजित विशेष सैनिक संमेलनात शौर्य पदक विजेत्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा सन्मान करताना प्रत्येक शब्दात देशप्रेमाचा आदर आणि बांधिलकीची अनुभूती होती. शिस्त, समर्पण आणि सहकार्य यांचे अद्वितीय उदाहरण ठरलेले हे संमेलन उपस्थित सर्वांच्या मनावर प्रेरणादायी ठसा उमटवून गेले.
यंदाच्या उत्सवात मुसळधार पावसामुळे काही कार्यक्रम — सांस्कृतिक संध्या, मानचिन्ह समारंभ इत्यादी — पुढे ढकलण्यात आले. मात्र कमांडंट किंडो यांनी सांगितल्याप्रमाणे, “पाऊस हा जवानांचा शत्रू नव्हे, साथी आहे. हे कार्यक्रम लवकरच पुन्हा नव्या उमेदीने पार पाडले जातील.”
या संपूर्ण कार्यक्रमाने ३७ वी वाहिनीची परंपरा, तिचे शौर्य, आणि राष्ट्रसेवेतील अमरत्व पुन्हा अधोरेखित केले. हे एक स्मरण होते – की रक्षणाची ही रणभूमी केवळ शस्त्रांची नाही, तर संयम, श्रद्धा आणि राष्ट्रासाठीच्या अथांग प्रेमाची आहे. शेवटी, प्रत्येक मनात उरली ती एकच भावना —“या ध्वजाखाली जन्मलो, त्याच्यासाठी मरणही स्वीकारू…!”