Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुरात 32 लाख किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

2020-21 मध्ये 98 लाख 34 हजाराचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे काल रुपये 31 लाख 57 हजार 780 किंमतीचा प्रतिबंधीत पानमसाला जप्त करण्यात आला असून चालु आर्थीक वर्षात आतापर्यंत तब्बल 98 लाख 34 हजार 463 किंमतीचा प्रतिबंधीत अन्न साठा जप्त करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. या. सोनटक्के यांनी दि. 19 जानेवारी रोजी धनलक्ष्मी अपार्टमेंट, एस. पी. कॉलेज मागे, गंजवार्ड, चंद्रपूर येथे एका फ्लॅटची तपासणी केली असता सदर फ्लॅटमध्ये मे. जया ट्रेडिंग कंपनी यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा सिग्नेचर पान मसाला, ओरीजनल गोल्ड सुगंधित टोबॅको व रेस गोल्ड सुगंधित टोबॅको विक्रीकरीता साठविल्याचे आढळून आले.

यावेळी 1) सिग्नेचर पान मसाला 5283 नग, वजन 718.488 कि. ग्र., किंमत रु. 1796220/-, 2) ओरीजनल गोल्ड सुगंधित टोबॅको 1364 नग, वजन 272.8 कि. ग्रॅ., किंमत रु. 1350360/- 3) रेस गोल्ड सुगंधित टोबॅको 56 नग, वजन 25.2 कि. ग्रॅ., किंमत रु. 11200/- प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. याची एकूण किंमत रु. 31,57,780 आहे. हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतलेला असून पुढील तपास सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सर्वसाधारण जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी राज्यात गुटखा, पान मसाला, खर्रा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखु इत्यादी अन्नपदार्थाच्या निर्मिती, साठा, विक्री, वितरण, वाहतूक यावर बंदी घातलेली आहे.

अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयाने सन 2020-2021 या कालावधीत एकुण 39 पेढयांवर कारवाई घेवून रु. 98 लाख 34 हजार 463 किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ संबंधित कोणताही व्यवसाय करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनचे पथक प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी कळविले आहे.

Comments are closed.