गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांची छावणी उद्ध्वस्त करून शस्त्रसाठा केला जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी करत नक्षलवादी छावणी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत दोन शस्त्रे, दारुगोळा, स्फोटके, नक्षल साहित्य व वैयक्तिक वस्तू असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
भामरागड दलमने कवंडे परिसरात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (FOB) जवळ जंगलात छावणी उभारल्याची खात्रीशीर गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना काल (११ मे) दुपारी मिळाली होती. त्यानंतर लगेचच अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० सी-६० कमांडोंच्या विशेष पथकाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली.
आज (१२ मे) सकाळी जंगलात सुरू असलेल्या शोधदरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. सी-६० कमांडोंनीही तत्काळ प्रत्युत्तर देत ठोस कारवाई केली. सुमारे दोन तास चाललेल्या या चकमकीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादी व पोलिसांमध्ये जोरदार गोळीबार झाला.
चकमकीनंतर सुरू असलेल्या क्षेत्रतपासणीत पोलिसांनी एक INSAS रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत राऊंड्स, डेटोनेटर, एक वॉकीटॉकी, वायरलेस चार्जर, तीन पिट्ठू, तसेच मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व वैयक्तिक वस्तू हस्तगत केल्या. सी-६० कमांडोंनी नक्षल छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त केली असून, काही नक्षलवादी या कारवाईत जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जंगलात घेऊन गेल्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या भागात शोधमोहीम अधिक शीघ्र करून सर्च ऑपरेशन सुरू आहे. अधिक माहिती पत्र परिषदेमध्ये लवकरच अधिकृत देण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.