अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड : विकास की विस्थापन ?’ पुस्तकाचे प्रकाशन
गडचिरोलीतील खाणींचा समाजजीवनावरील परिणामांचे संशोधन आले पुढे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर : चंद्रपूर येथील प्रथितयश युवा लेखक, संशोधक, मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ या बहुचर्चित संशोधन पुस्तकाचे नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित समता महोत्सवात प्रकाशन करण्यात आले.
प्रसिद्ध अर्थतज्ञ व अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरचे प्रा.नीरज हातेकर, जनतेचा महानायकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते सुनील खोब्रागडे, भटक्या-विमुक्त चळवळीतील अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव, अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच रजनी पवार, हेमलकसाचे सामाजिक कार्यकर्ते चिन्ना महाका, कोरो संस्थेच्या मुमताज शेख, सुप्रिया जाण, कुणाल रामटेके, मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच गंगा जावरकर, प्रमोद काळे, तुकाराम पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाचे वास्तव मांडणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाला प्रख्यात विचारवंत व संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांची प्रस्तावना व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांचे ब्लर्ब आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी, संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲड.असीम सरोदे, ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे महत्त्वाचे अभिप्राय आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे, सुजाता खांडेकर, अंजली मायदेव, संध्या नरे-पवार, सुभाष वारे, अभिजीत कांबळे, दिशा पिंकी शेख, डॉ. चंद्रिका परमार, भीम रासकर, डॉ. विभूती पटेल, सुरेश सावंत, संजय सोनवाणी आदी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
लेखक अविनाश पोईनकर आदिवासी व ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात राहून शोध पत्रकारितेच्या अंगाने त्यांनी हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. सुरजागडसह प्रस्तावित खाणींमुळे स्थानिक आदिवासींवर होणारा परिणाम, भांडवलशाही धोरणे, माओवाद, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची भूमिका तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन विषयक कायदे व त्याची सद्यस्थिती, आंदोलने व सर्वसामान्य आदिवासींची होणारी गळचेपी या पुस्तकात सविस्तर मांडली आहे. या संशोधनासाठी पुणे येथील साधना साप्ताहिकाने तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती दिली होती. पुणे येथील हर्मिस प्रकाशनाने हे संशोधन पुस्तक प्रकाशित केले आहे.
Comments are closed.