नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक – जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह
चला जाणूया नदीला उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 21 जून – आजच्या काळातील शुद्ध पाण्याची आवश्यकता, आणि उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नाही. माणसांव्यतीरीक्त पशु, पक्षी तसेच जंगल, जमीन यांनाही पाण्याची गरज असतेच. त्यामुळे नद्यांना अमृत वाहिनी केल्याशिवाय पर्याय नाही. नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक आहेत असे मत जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांनी केले. ते चला जाणूया नदीला याअंतर्गत नदी संवाद यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. आपल्यासह सभेावताली असलेल्या निसर्गातील सर्वांनाच पाण्याची गरज आहे. नद्या या प्रत्येक भागात पाणी नेवून पोहचविणाऱ्या अमृत वाहिन्या आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यापासून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण व प्रदुषण रोखण्यासाठी आपणाला त्यांच्या जवळ जावून अभ्यास करावा लागेल असे ते पुढे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला पद्मश्री परशुराम खुणे, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णाजी गजबे, मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे राहूल मोरघडे, डॉ.सुमन पांडे, प्रविण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी उपस्थित होते.
राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, नदीला जाणून घेत असताना अतिक्रमण, प्रदुषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यासही आपणाला करावा लागेल. यासाठी शासन व प्रशासन आणि नागरीकांनी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की त्यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमात प्राधान्याने सहभाग घेवून एक चांगली योजना शासन निर्णय काढून सुरू केलेली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना नद्यांबाबत असलेले सत्य आपणाला समोर आणून त्यावर उपाययोजना करावयाच्या आहेत. त्यामुळे आपण सत्य स्थिती अभ्यासून आपल्या नद्यांना खऱ्या अर्थाने अमृत वाहिन्या करूयात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुर रेषा निश्चित करून नदीची जमीन किती आहे ते पाहिले पाहिजे, नदीमधील रेतीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचे मोजमाप निश्चित केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
खासदार अशोक नेते यांनी चला जाणूया नदीला या सारख्या कार्यक्रमांची गरज असल्याचे नमूद करून नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. पद्मश्री परशुराम खुणे यांनी नद्यांबाबतचा गावकऱ्यांबरोबरचा संवाद कायम ठेवून पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.किशेर मानकर यांनी जलपुरूष राजेंद्र सिंह यांचे कार्य उपस्थितांना सांगितले. तसेच नद्यांमधील प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आमदार कृष्णाजी गजबे यांनी नदींचा अभ्यास, जैवविवीधता, पर्यावरण संतुलनाचे महत्व उपस्थितांना सांगितले.
नदी प्रहरी कठाणी नदी मनोहर हेपट, पोटफोडी नदी प्रकाश अर्जुनवार, खोब्रागडी नदी केशव गुरूनुले, सती नदी डॉ. सतिश गोगुलवार यांचा कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी संवाद यात्रेत केलेल्या कामाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलीश शर्मा यांनी केले तर आभार राहूल मोरघडे यांनी मानले. सुत्रसंचलन दहीकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान – उत्कृष्ट लोकसहभागाबद्दल चारही नदींवरील गावांमधून प्रत्येकी दोन दोन गावांचा सन्मान करण्यात आला. यात खोब्रागडी नदीवरील प्रथम क्रमांक डोंगरगाव तर व्दीतीय क्रमांक नवरगाव या गावाचा आला. कठाणी नदीवरील जेप्रा प्रथम तर व्दीतीय आलेल्या दुधमाळा गावाचा सन्मान केला. पोहार पोटफोडी नदीवरील प्रथम क्रमांक शिवनी गावाला तर व्दीतीय पुरस्कार जांभळी गावाला मिळाला. तसेच यावेळी निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
हे पण वाचा :-
Comments are closed.