Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस.टी.आर.सी. तर्फे ‘पारंपारिक औषधी ज्ञान प्रणाली कार्यशाळा (IMK-2025)’ चे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली– गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) तर्फे 11 व 12 मार्च 2025 रोजी चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमी येथे ‘पारंपारिक औषधी ज्ञान प्रणाली कार्यशाळा (IMK-2025)’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश पारंपरिक उपचार करणारे वैद्य, संशोधक आणि धोरणकर्त्यांमध्ये समन्वय साधून पारंपारिक औषधी ज्ञान प्रणालीला पुढे नेणे हा होता.

कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चरुदत्त मायी (माजी अध्यक्ष, कृषी वैज्ञानिक निवड मंडळ), डॉ. रामदास आत्राम (कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठ, इंदौर), श्री. एम. श्रीनिवास रेड्डी (संचालक, चंद्रपूर वन अकादमी), डॉ. मिलिंद निकुंभ (प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), डॉ. श्रीराम कावळे (प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ) आणि डॉ. अनिल हिरेखान (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ) उपस्थित होते. कार्यक्रमात एस.टी.आर.सी. चे प्रमुख श्री. आशिष घराई, तसेच नामवंत प्राध्यापक, वैज्ञानिक तज्ज्ञ, पारंपरिक वैद्य आणि वनस्पती विज्ञान तसेच औषधशास्त्र क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. १८० हून अधिक सहभागींनी उपस्थिती दर्शवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उद्घाटन कार्यक्रमानंतर पारंपारिक वैद्य आणि त्यांच्या उपचार पद्धतींवर लक्ष केंद्रित करून पाच तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये उपचार पद्धती व आधुनिक विज्ञानाच्या समाकलनावर भर देण्यात आला. प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उपस्थित सहभागी आणि तज्ज्ञांमध्ये सखोल चर्चा व ज्ञानविनिमय घडून आला.

IMK-2025 अंतर्गत वनस्पतीशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र आणि धोरण रचनासंबंधी तज्ज्ञांचे विशेष तांत्रिक सत्र घेण्यात आले. याशिवाय आयुर्वेदिक उत्पादने, समुदाय-आधारित उपक्रम, तसेच औषधी वनस्पतींच्या वापरातील नवोपक्रमांचे प्रदर्शनही करण्यात आले. पारंपरिक औषधी ज्ञानातील एसटीआरसीच्या कार्याचा आढावा ध्वनी-चित्रफितींच्या माध्यमातून सादर करण्यात आला. औषधी वनस्पतींच्या शाश्वत उपयोग, व्यवसायीकरण आणि समुदायाच्या नेतृत्वाखालील संवर्धनावर भर देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यशाळेद्वारे औषधी वनस्पतींच्या शाश्वत वापराला चालना देणे, व्यावसायिकरणास प्रोत्साहन देणे आणि समुदायाच्या नेतृत्वाखालील संवर्धनाला महत्त्व देण्यात आले.

एस.टी.आर.सी. च्या कार्यसंघाने विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली. IMK-2025 च्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा पारंपारिक औषधी संशोधन आणि उद्योगाच्या केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Comments are closed.