कोरेगाव भीमा परिसरातील १६ गावांमध्ये ३० ते २ जानेवारी पर्यंत कलम 144 लागू
पुणे डेस्क, दि. २६ डिसेंबर: कोरेगाव भीमा सह पेरणे येथे दि. १ जानेवारी २०२१ रोजी अभिवादन कार्यक्रम या वर्षी प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तसेच बाहेरील येणाऱ्या नागरिकांना कोरेगाव भीमा परिसरातील 16 गावांमध्ये येण्यास बुधवार (दि. 30) ते दि. 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी सहावाजेपर्यंत बंदी घालण्यात आली असून कलम 144 जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात शिक्रापूर (ता. शिरूर) येथे घेतलेल्या बैठकीत अधीक्षक डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर अधीक्षक मिलिंद देशमुख, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिक्रापूरचे निरीक्षक उमेश तावसकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असतात, मात्र, या वर्षीचा हा कार्यक्रम प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे, असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 देखील लागू केले आहे.
Comments are closed.