पोलिस विभागातील वरिष्ठ लिपिक हायवा ट्रकच्या चाकाखाली, गंभीर जखमी
प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख तातडीने दखल घेत आरोग्याची आस्थेने विचारपूस करून नागपूरला हेलिकॉप्टरने हलवले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता घडलेल्या भीषण अपघातात पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) हे गंभीर जखमी झाले. MH-34 M-8970 क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली त्यांची दुचाकी सापडल्याने त्यांचा डावा पाय पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे.
अपघातानंतर त्यांना तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तातडीने उपचारानंतर त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हेलिकॉप्टरमार्फत हलवण्यात आले.
पोलीस अधीक्षकांचे तत्पर कृतीमानवतेचे दिले दर्शन.
अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वासनिक यांना पोलिस विभागाच्या वाहनाने रुग्णालयात दाखल केले. प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्वतः तत्काळ रुग्णालयात धाव घेत जखमी लिपिकांची विचारपूस केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नागपूरला हेलिकॉप्टरने नेण्याची तातडीची व्यवस्था केली.त्यांच्या संवेदनशीलतेमुळे पोलीस दलासह जनसामान्यांमध्ये समाधान आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी दाखवलेली माणुसकीची भूमिका पोलिस खात्याच्या मनोबलवृद्धीत मोलाची ठरली असून परिवारासह जनमानसात कौतुक केल्या जात आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर; विभागात दुहेरी आघात
जखमी वासनिक यांचा मुलगा बाबासाहेब वासनिक हेही पोलीस दलात कार्यरत असून, सध्या कोठी पोलिस मदत केंद्रात तैनात आहेत. या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण वासनिक कुटुंब हादरून गेले आहे. विशेष म्हणजे, काल सायंकाळीच पोलिस अधीक्षक कार्यालयातील एक अन्य लिपिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी घडलेली ही दुर्घटना पोलिस विभागावर दुहेरी घटना घडल्याने कार्यालय तसेच गावात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
वारंवार अपघात होत असल्याने कायम सुरक्षाची मागणी.
जिल्हा सत्र न्यायालय चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील चौक मानला जातो. येथूनच एमआयडीसी, सेमाना बायपास आणि राष्ट्रीय महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांची जोडणी होते. मात्र, येथे ना ट्राफिक सिग्नल आहेत, ना गतिरोधक; ना वाहतूक नियंत्रकांची उपस्थिती. परिणामी दर काही दिवसांनी एखादा अपघात घडल्याशिवाय राहत नाही. स्थानिक नागरिक वारंवार आवाज उठवत असूनही, प्रशासनाकडून अद्याप ठोस पाहिजे तसे पाऊले उचलली आलेली नाहीत.
नागरिकांमध्ये तीव्र संताप, प्रशासनावर ताशेरे
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. “घटनेनंतर सगळे धावतात, पण आघात घडू नये म्हणून कोणीही वेळीच उपाययोजना करत नाही,” अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
“हा चौक कायमच वरदड राहत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही येथे कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त, वाहतूक पोलिस किंव्हा सिग्नल व्यवस्था निर्माण करावी असा सवाल आता उघडपणे नागरिक करीत आहेत.तर दुसरीकडे प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे हे घटनेचा अधिक तपास करून वाहन चालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे.
Comments are closed.