अहेरी नगरातील आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवा
शिवाजीनगर येथील नागरिकांची अहेरीचे नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
अहेरी, दि. ५ जानेवारी: अहेरी नगरातील आठवडी बाजाराच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्याचे निराकरण करण्यात यावे. अशी मागणी शिवाजीनगर प्रभाग क्र. ६ येथील नागरिकांनी अहेरीचे नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
अहेरी नगरात आठवड्याला शनिवारी बाजार भरतो नगरपंचायत प्रशासनाने जागेची अडचण लक्षात घेऊन लहान तलाव नजीक बाजाराची जागा उपलब्ध करून दिलेली आहे. बहुतांश दुकानदार याच जागेवर आपले दुकान लावतात. परंतु काही दुकानदार आजाद चौक ते दानशूर चौक, आझाद चौक ते मस्जिद छोटा बस स्टॉप चा रस्त्यावर आपली दुकाने लावतात. जेव्हा की नगरपंचायतने आठवडी बाजार भरवण्याकरिता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तरीसुद्धा काही दुकानदार शनिवारी अहेरीच्या मुख्य रस्त्यावर आपली दुकाने लावल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होतानाचे प्रसंग नेहमी घडतात. त्यामुळे पादचार्यांना तसेच दुचाकी व चारचाकी स्वारांना रहदारीसाठी अडचणीचा सामना करावा लागतो. प्रसंगी रस्त्यावर लहान-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. तसेच अहेरी नगरात उपजिल्हा रुग्णालय असून रुग्णांना ने-आण करतांना ॲम्बुलन्सला अनेकदा ताटकळत राहावे लागले आहे.
अहेरी नगरातील दळणवळणाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुकानदारांना नेमून दिलेल्या ठिकाणीच दुकाने लावण्यासाठी प्रवृत्त करावे. जेणेकरून अहेरी नगरातील नागरिकांना ॲम्बुलन्सला तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना रहदारीची व वाहतुकीची समस्या जाणवणार नाही.
अशी मागणी निवेदनाद्वारे शिवाजी नगर प्रभाग क्र. ६ चे नागरिक देवेंद्र खतवार, विनोद जिल्लेवार, मयूर पिपरे, अनुराग जक्कोजवार, अनिकेत ओंडरे, प्रकाश मंडल, विलास उईके, आदित्य जक्कोजवार, हरीश पुरोहित यांनी केली आहे.
Comments are closed.