Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री फडणवीस

गुप्तचर आदानप्रदान, सायबर सुरक्षा आणि जलद प्रतिक्रिया यंत्रणा यावर भर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दलांमध्ये समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, सायबर सुरक्षेची रणनीती, आणि संरक्षण दलांसाठी राज्य सरकारकडून होणाऱ्या सहकार्याच्या विविध अंगांवर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राज्य सरकार आता संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने आणि गतिशीलतेने काम करणार आहे. ऑपरेशन सिंदुरसारखी अचूक व धाडसी मोहीम भारतीय लष्कराने ज्या पद्धतीने पार पाडली, ती कौतुकास पात्र आहे.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महत्त्वाची उपस्थिती

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, नौदलाचे रियर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी, कमांडर नितेश गर्ग, वायुदलाचे एअर वाईस मार्शल रजत मोहन हे उपस्थित होते. तसेच आरबीआय, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई शेअर बाजार, नॅशनल शेअर बाजार, एटीएस, होमगार्ड आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईसाठी विशेष दक्षता आवश्यक – मुख्यमंत्री

मुंबईसारखे शहर हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे आर्थिक केंद्र आहे. यापूर्वीच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारताच्या आर्थिक केंद्रावर हल्ला केल्याचे दाखवण्याचा शत्रूचा हेतू स्पष्ट दिसून आला होता. “आता आपल्याला संपूर्ण तयारीनिशी आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे उत्तर द्यावे लागेल. गुप्तचर माहितीचे वेळेवर आदानप्रदान, सायबर सुरक्षेबाबत दक्षता, आणि जलद प्रतिसादासाठी तांत्रिक पातळीवर सज्जता आवश्यक आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणांची हजेरी..

या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, गुप्तवार्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.