अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कारवाई – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पार पडणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार यंदा बालविवाहाच्या घटनांवर थेट कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष ॲक्शन प्लॅन तयार केला असून, ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांना तर शहरी भागात बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बालविवाहात सहभागी होणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या धार्मिक गुरू, पंडित, मंडप मालक, छायाचित्रकार, केटरिंग व्यावसायिक, लॉन मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, या शुभ दिवशी विवाह विधी मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 अथवा 112 वर संपर्क साधावा. दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील सहा वर्षांत 17 बालविवाह थांबविण्यात आले असून, राज्यात एकूण 5 हजार 421 बालविवाह रोखण्यात आले आहेत. यापैकी 401 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16 (1) नुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, गडचिरोली यांनी दिली आहे.
Comments are closed.