Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाआवास अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे, दि. 22 जानेवारी: प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. पक्क्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली महा आवास ग्ग्रामीण अभियानाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करून गरीब कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार करा असे निर्देश मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज महा आवास अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

“सर्वासाठी घरे 2022” हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत “महा आवास अभियान-ग्रामीण” राबविणेत येत आहे. त्याअनुषंगाने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी आवास दिनाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय शुभारंभ कार्यशाळेला संबोधित केले. ठाणे जिल्हयात सन 2016-17 ते सन 2020-21 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 6626 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 5695 एवढी घरकुले पुर्ण करण्यात आलेली आहेत. 86 % घरकुलांचे काम पुर्ण झालेले आहे. 931 अपुर्ण घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम जमाती घरकुल योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2016 ते 2019-20 पर्यंत एकूण 3495 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून 2761 घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. 79% घरकुलांचे काम पुर्ण झालेले आहे. उर्वरीत 734 अपुर्ण घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच नाविन्यपुर्ण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयामध्ये बहुमजली इमारती बांधण्याकरीता लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून तसेच जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांना बँकेमार्फत घरकुल बांधणेसाठी कर्जस्वरुपात र.रु.70,000/- उपलब्ध करुन देण्यात यावे. जिल्हयातील महिला बचत गटांचा सहभाग वाढवून घरकुलांचे बांधकाम साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी घरकुल मार्ट उभारण्यात यावेत. तसेच ठाणे जिल्हयामध्ये ग्रामीण भागात दर्जेदार घरकुलं बांधकाम होण्याकरीता व प्रत्येक गरजू लाभार्थ्याला घरकुल मिळवुन देण्यासाठी सर्व यंत्रणेने काम करावे.

या अभियानाच्या माध्यमातून भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांच्या उदिदष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उदिदष्टांनुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल (Delayed Houses) पुर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्टया पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण (Rural Mason Training) पूर्ण करणे, डेमो हाऊसेस (Demo House)उभारणे, कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग/ जॉब कार्डमॅपिंग 100 टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम(Convergence) व नावीन्यपूर्ण उपक्रमांची (Innovative / Best Practices) अंमलबजावणी करणे आदी कामे या अभियान काळात पूर्ण करण्यात येणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.