विद्यार्थ्यांनी घेतली वसुंधरा रक्षणाची शपथ
गडचिरोली, ३ जानेवारी: राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत हरित ई-शपथ (ई – प्लेज) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा या उद्देशाने किलबिल नेचर क्लबच्या वतीने स्थानिक वसंत विद्यालयात शनिवार (ता. २) हा अनोखा शपथ सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, क्रेन्स संस्थेच्या सचिव तथा योग शिक्षिका अंजली कुळमेथे, विद्यालयाच्या शिक्षिका मिरा बिसेन, संध्याताई पोरेड्डीवार, निलिमा बोरावार, सुचिता कामडी, अनिता बेले, एम. बी. काटेंगे, गजानन उमरे, एम. आर. लांजेवार, एम. एम. रामटेके, लालचंद कोसे, सतीश धाईत, मोतीराम गोन्नाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व मुख्याध्यापक शेमदेव चाफले, योग शिक्षिका अंजली कुळमेथे यांनी निसर्ग रक्षणाचे महत्त्व विशद करताना राज्य सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच या उपक्रमात सर्वांनीच सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सामुहिक शपथ घेण्यात आली. शिक्षिका मिरा बिसेन यांनी शपथेचे वाचन केले. या कार्यक्रमानंतर शाळेच्या परीसरात आंबा, पेरू, सिताफळ अशी फळझाडे व अमृता (गुळवेल) आदी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments are closed.