भाजपचे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांचा शिंवसेनेत प्रवेश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नाशिक डेस्क 8 जानेवारी:- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी आज (८ जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राउत म्हणाले, आज नाशिकमध्ये वसंत गिते आणि बागुल प्रवेश करत आहेत. आम्ही सतत एकमेकांशी बोलत आहोत. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर देखील गिते व बागुल यांची चर्चा झाली. त्यानंतर प्रवेश निश्चित झाला. आज त्यांचा प्रवेश होतो आहे. हे दोन्ही नेते सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतील. मुंबईमध्ये त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिक पुन्हा एकदा शिवसेनेचा गड अभेद्य बनावा याकरीता यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. गिते आणि बागुल यांना आम्हाला नवीन नाही. आमच्यात परकेपणा नाही. मी व्यक्तीशः गिते व बागुल यांचे परिवारात मनापासून स्वागत करतो.
गिते आणि बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली होती. दरम्यान, २ दिवसांपूर्वीच माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता भाजपमधील २ नेते शिवसेनेत गेल्याने नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले आहे.
Comments are closed.