भरनोली दूरक्षेत्र जंगलात दहा किलो वजनाचे स्फोटके जप्त; नक्षल्यांचा घातपाताचा प्रयत्न उधळला
गोंदिया, 10 जानेवारी: जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी जंगलात पेरुन ठेवलेले 10 किलो वजनाचे स्फोटके पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई आज भरनोली दूरक्षेत्र जंगलात करण्यात आली.
अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांना भरनोली दूरक्षेत्र जंगलात नक्षल्यांनी स्फोटके पेरुन ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या नेतृत्वात नवेगावबांधचे सी-60 जवान, दूरक्षेत्र भरनोलीचे अधिकारी व अंमलदार, गोंदियाचे श्वानपथक, बीडीडीएस पथकाने जंगल परिसरात शोध मोहिम राबविली. यादरम्यान बोरटोला ते धानोली डोंगर परिसरात नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके आढळली. एका दगडाखाली जर्मन डब्ब्यात 10 किलो वजनाचे लोखंडी खिळे, काच, वायर, काळी स्फोटक पावडर ठेवले होते. पोलिसांनी स्फोटके जप्त केली असून नक्षलवाद्यांवर भादंवि 18, 20, 23 तसेच भारतीय स्फोटक पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल करीत आहेत.
Comments are closed.