तेरी मेहरबानियाँ… CRPFच्या ‘वेन्स’चं निधन; लाडक्या श्वानाला निरोप देताना अधिकारी, जवानांचे डोळे पाणावले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
ओमप्रकाश चूनारकर/ रवि मंडावार
गडचिरोली, 6 जून – मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरक्षा यंत्रणांच्या सोबत काम करणाऱ्या वेन्स या श्वानाच आज आकस्मिक मृत्यू झाला. वेन्स अहेरी येथील ३७ बटालियन, CRPF यांच्या पथकात महत्त्वाची भूमिका बजावत होता. वेन्सच्या जाण्याने सीआरपीएफला मोठा फटका बसला आहे.
अगदी कमी वेळेत वेन्सने सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना लळा लावला होता. त्यामुळे अनेकांना वेन्सच्या जाण्याने अश्रूही अनावर झाले. वेन्सचे रविवारी संध्याकाळी गडचिरोलीच्या G/३७ वी वहिनी, कोठी, भामरागड येथे आकस्मिक निधन झाले.वेन्स अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोठीमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आले होते. वेन्सने महत्त्वाच्या नक्षली कारवायांमध्ये बजावलेल्या कामगिरीमुळे त्यांनी अनुपस्थिती यापुढे नक्की जाणवेल.
वेन्सचा प्रवास
वेन्स चा जन्म १४ नोव्हेंबर २०१९ रोजी डीबीटीएस (डॉग ब्रिडींग अँड ट्रेनिंग स्कूल) तरालु येथे झाला. तेथे त्याने दोन हँडलर कॉन्स्टेबल जीडी अभिजित चौधरी आणि कॉन्स्टेबल जीडी शुभजित गराई यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान वेन्सने सर्वोत्कृष्ट श्वानाचा किताब पटकावला.
त्यानंतर, १३ एप्रिल २०२१ पासून वेन्सची ३७ बटालियनमध्ये नियुक्ती करण्यात आली आणि अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये भाग घेऊन, दलाला IED/ ॲम्बुश इत्यादी नुकसानीपासून वाचवले. वेन्स स्फोटक शोधून, आईपी (इन्फन्ट्री पेट्रोल) आणि हल्ला करण्यात माहिर होता.
वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली
सुरक्षा दलातील शूर श्वानाचा सन्मान करण्यासाठी, ३७ बटालियन, सीआरपीएफचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे, ०९ बटालियनचे कमांडंट आर. एस. बालापूरकर आणि ३७ व ०९ बटालियनचे सर्व अधिकारी, अधिनस्थ अधिकारी आणि सर्व जवान उपस्थित होते. सर्वांनी श्रद्धांजली अर्पित करून पाणावलेल्या डोळ्यांनी वेन्सला अखेरचा निरोप दिला.
हे पण वाचा :-
Comments are closed.