सामान्य माणसाचे स्वप्न आता लवकरच साकार होणार” – सहपालकमंत्री जयस्वाल यांची ग्वाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : “सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गरजूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. लवकरच हे स्वप्न वास्तवात उतरेल,” अशी ठाम ग्वाही राज्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी आज दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
जयस्वाल यांनी आपल्या भाषणात शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत घरकुल योजनांमधील यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी, आदिम आवास योजनांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगताना त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. भविष्यात हा जिल्हा राज्यातील इतर आघाडीच्या जिल्ह्यांच्या पंक्तीत सामील होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहपालकमंत्री जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, तसेच दुर्गम भागात आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या उद्देशाने पाच नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सहपालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments are closed.