Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“टेकोड्यांचं सोनं” : गडचिरोलीच्या जंगलातून बाजारपेठेत निसर्गाची समृद्ध झळाळी

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, २ जुलै : पावसाच्या पहिल्याच सरींसोबत गडचिरोलीच्या घनदाट जंगलात उगवणाऱ्या टेकोड्यांनी अर्थात नैसर्गिक मशरूमनी जिल्ह्याच्या बाजारपेठा व्यापल्या असून, ग्राहकांच्या खरेदीसाठी झुंबड उडत आहे. आदिवासी बांधवांनी जंगलातून गोळा केलेल्या या अळंबींना स्थानिक बाजारात दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नैसर्गिक समृद्धीचा हातभार लागला आहे.

जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा,धानोरा, मुरुमगाव, कोरची, भामरागड, पेरमिली, सिरोंचा आणि आलापल्ली मार्गावरील बसथांब्यांपासून स्थानिक आठवड्याच्या बाजारांपर्यंत दररोज सकाळी अळंबी विक्रीचे स्टॉल्स थाटले जात आहेत. डोक्यावर टोपल्या, अंगात ओलसर साड्या आणि चेहऱ्यावर समाधानाचा भाव घेऊन येणाऱ्या महिला विक्रेत्यांनी बाजारपेठा सजवलेल्या दिसतात. ही फक्त विक्री नसून गडचिरोलीतील स्त्रीशक्तीची, निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीची सजीव साक्ष ठरते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या नैसर्गिक मशरूमना पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म लाभले असल्याने ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर त्यांच्या खरेदीकडे वाढत आहे. परिणामी, अनेक आदिवासी कुटुंबांना पावसाळ्याच्या दिवसांत हंगामी उत्पन्नाचा मोठा आधार मिळतो आहे. मशरूमचा साठा अधिक झाल्यास स्थानिक पद्धतीने ती वाळवून भुकटी रूपात साठवली जाते. ही भुकटी वर्षभर भाज्यांत, आमटीत अथवा खिरीत वापरता येते. त्यामुळे चव आणि आरोग्य दोन्हीचा लाभ मिळतो.

स्थानिक आदिवासी जीवनपद्धतीनुसार या अळंबींमध्ये ताप, अपचन, थकवा, सांधेदुखी यावर उपयुक्त ठरणारे घटक असल्याचं मानलं जातं. वयोवृद्ध नागरिक टेकोड्यांचं नियमित सेवन करून त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम अनुभवत आहेत. त्यामुळे या अळंबींचं स्थान केवळ बाजारापुरतं मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण समाजाच्या जीवनशैलीत खोलवर रुजलेलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मशरूम म्हणजे केवळ जंगलातील उत्पादन नव्हे, तर आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा आणि निसर्गनिष्ठ जगण्याच्या शहाणपणाचा ठेवा आहे. ‘टेकोड्यांचं सोनं’ हे केवळ खाण्यासाठी नाही, तर जतन करण्यासाठीही तितकंच मोलाचं आहे. ही समृद्धी निसर्गाने दिलेली असून, तिचं जपणं हे आपण सगळ्यांचं सामाजिक उत्तरदायित्व आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.