Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Get real time updates directly on you device, subscribe now.

शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती आणणारा हा कार्यक्रम ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिंधुदुर्गनगरी, 6 जून – जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ चा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज कुडाळ येथे झाला. मुख्यमंत्री  शिंदे यांनी, ‘ माका ही गर्दी बघून खूप आंनद झालो. कसे असात… बरे असात ना…’ अशी मालवणी बोलीतून आपल्या भाषणाची सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, कोकणी माणूस बाहेरुन फणसासारखा व आतून  गोड गऱ्या सारखा असतो. सिंधुदुर्ग सारख्या छोट्या जिल्ह्यात 50 हजारांपर्यंत नेण्याची जादू  आपण सर्वांनी केली आहे. शासन आणि लाभार्थी यातील अंतर मिटवून टाकण्यासाठी शासन आपल्या दारी याची सुरुवात पाटण येथून झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय. एकाच छताखाली लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सर्वश्री आमदार भारत गोगावले, रविंद्र फाटक, नितेश राणे, माजी  खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्यक कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल  आदी उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे सांगायचे सर्व सामान्य लोकांना सरकार दरबारी चकरा माराव्या लागता कामा नयेत, अशा पध्दतीने राज्य कारभार केला पाहीजे. त्याच धर्तीवर शासन काम करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांसाठी 679 कोटी रुपयांना मान्यता दिली आहे.यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारत बांधकाम, मौजे मिठबांव- गजबा देवी मंदिर परिसर, सिंधुरत्न समृध्द योजना, बॅ. नाथपै स्मारक यांचा समावेश आहे. सरकारी काम सहा महिने थांब ही म्हण मोडीत काढायची आहे. त्यासाठीच जिल्ह्याचे अधिकारी गावागावात संवाद साधू लागले आहेत. केवळ मंत्रालयात बसून लोकांची दु:खं समजून घेता येत नाहीत. सर्व सामान्य लोकांना काय हवं हे ऐकून घेणारे सरकार आहे. कागदी घोडं नाचवणारे नसून प्रत्यक्ष कृतीमधून दिसणारं सरकार आहे. तुमच्या मनातलं सरकार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

म्हणूनच लोकांना काय पाहीजे हे ओळखून कधी-कधी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्या कॅबिनेटपासून लोकाभिमुख निर्णय घेतले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, तरुण ज्येष्ठ नागरिक यांचं काहीतरी देणं लागतय म्हणूनच तुमच्या दारापर्यंत सरकार येवून तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याच्या अनेक योजनांना केंद्राचे शंभर टक्के पाठबळ मिळत आहे. 7 टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. त्या प्रकल्पालाही निधी लागणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींना विनंती करतोय. निश्चितच कोकणाला पाठबळ मिळेल. कोकण विकास प्राधिकरणाचा निर्णय घेतला आहे. कोकणातला बॅकलॉग भरुन काढतोय. नोकरी, रोजगारांच्या माध्यमातून कोकण समृध्द करायचा आहे. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाने घ्यायचे, असा निर्णय घेतला आहे. एलएनजीच्या माध्यमातून वातानुकुलित एसटी केल्या जातील.
सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. विकास असा झाला पाहिजे की, जगाला हेवा वाटला पाहीजे, असा संकल्प करुया, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरुपात  शासन योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र, वाहनांच्या चाव्या, धनादेश वितरीत करण्यात आले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.