Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांनी व इतर नेत्यांनी केले दुःख व्यक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मुंबई डेस्क, दि. १० डिसेंबर : श्री विष्णु सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थनासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत. उत्तम संघटक असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्‍या जीवनाचा अस्त झाला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विष्णू सावरा यांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला: देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंवेदना

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार

माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

विष्णू सवरा यांनी कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी ते आयुष्यभर झटले . विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed.