गडचिरोली जिल्ह्यातल्या नवनिर्मित पोस्टे कवंडेच्या पोलीस दलानं स्थापनेच्या दिवशीच परिसरातल्या माओवाद्यांची स्मारकं केली उध्वस्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:- जिल्ह्यात अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात मौजा कवंडे इथं कालच नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. या पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यवाहीदरम्यान मिडदापल्ली ते कवंडे मार्गावर माओवाद्यांची स्मारकं असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं.
सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती. गडचिरोली पोलीस दलाच्या बिडीडीएस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी सदर परिसरात शोध अभियान राबवत मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर तसेच पोस्टे कवंडेच्या शेजारील परिसरातली माओवादयांची 4 स्मारकं सखोल तपासणी करून उध्वस्त केली. यामुळे या परिसरातल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहेे.
या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केलं असून, माओवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही लक्ष केंद्रित केलं असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. तसंच माओवाद्यांच्या या स्मारकाला समाजात कुठेही स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.