Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांकरीता सीआरझेड परवानगीसाठी नियमानुसार प्रक्रिया गतिमान करावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २८ मे: रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सागरी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या गाव संरक्षणासाठी आवश्यक असलेले धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असलेली सीआरझेड परवानगी मिळण्याबाबत आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना नियमानुसार मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पर्यावरण संचालक नरेंद्र टोके, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह संबंधीत पत्तन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी
सीआरझेड मान्यतेबाबत महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे मिऱ्या बंदराचा एकच प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावर प्राधिकरणाच्या पुढच्या बैठकीत चर्चा करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २१ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २८ प्रस्ताव पत्तन व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रस्तावावरही संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रस्ताव लवकरात लवकर सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

खासदार विनायक राऊत यांच्या विनंतीवरुन या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच आलेल्या तौक्ते वादळामुळे सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी तसेच खाडी किनारी भागाला मोठा फटका बसला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्राचे पाणी घुसून घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सागरी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या गाव संरक्षणासाठी धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी सीआरझेडच्या परवानग्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.