“शब्द नव्हते, डोळ्यांत पाणी होतं!” – सेवेचा निरोप घेताना चंद्र्याजींच्या सेवेला समाजाचा सलाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा दि,१७ : “आपली सेवा हीच आपली ओळख,” हे आयुष्यभर जपणारे पंचायत समितीचे परिचर चंद्र्याजी मल्लेमपल्ली यांनी अखेर आपल्या 35 वर्षांच्या सेवेचा निरोप घेतला. त्यांच्या प्रामाणिक, नम्र आणि समाजाभिमुख कामगिरीला गौरव देण्यासाठी एकत्र जमलेल्या गावकऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यांत आज पाणी होतं. त्यांच्या सन्मानासाठी खास आयोजीत केलेल्या कार्यक्रमात माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.
1989 साली परिचर म्हणून रुजू झालेल्या चंद्र्याजींनी पंचायतराज व्यवस्थेत केवळ कार्यालयीन कामं केली नाहीत, तर गरजूंना शासकीय योजना पोहोचवणं, अडचणीत मदतीचा हात देणं आणि सर्वसामान्य जनतेशी माणुसकीनं वागणं हेच त्यांच्या कर्तृत्वाचं अधिष्ठान ठरलं. निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या या सेवेचा सन्मान करताना सभागृहातील वातावरण भारावून गेलं.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, भाजपा नेते प्रकाश गेडाम, प्रदेश सदस्य रवी ओलालवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, उपाध्यक्ष गणेश गारघाटे, जिल्हा सचिव बादल शाह, महामंत्री सुभाष गणपती, नगरसेवक दिलीप आत्राम, निखिल हलदार, उमेश पेडुकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावकरी व भाजपा कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आज निवृत्त होतोय… पण समाजासाठी माझं मन कायम कार्यरत राहील,” असं भावुक उद्गार मल्लेमपल्ली यांनी शेवटी काढलं. अशा कर्मयोग्यांच्या सेवेचा आदर करणं हेच खरं समाजाचं कर्तव्य असल्याचं मत उपस्थितांनी एकमुखानं व्यक्त केलं.
Comments are closed.