एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा विषबाधेने मृत्यू; आईची भूमिका संशयास्पद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेरपोली गावात घडलेली एक अत्यंत वेदनादायक घटना सध्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. एकाच कुटुंबातील सख्या तीन चिमुकल्या बहिणींना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत मुलींची नावे काव्या संदीप भरे (वय १०), दिव्या संदीप भरे (वय ८) आणि गार्गी संदीप भरे (वय ६) अशी आहेत. या तीनही बहिणींचा मृत्यू काही तासांच्या अंतराने उपचारांदरम्यान झाला.
प्राथमिक माहितीवरून समजते की, काही महिन्यांपूर्वी कुटुंबातील वडील-मुलगी यांच्यातील वादामुळे आईने आपल्या मुलींना घेऊन माहेरी, आस्नोली या गावात आश्रय घेतला होता. याच ठिकाणी राहात असताना एका जेवणानंतर सर्व मुलींना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. यातील दोन मुलींना मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर एकीला घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिन्ही मुलींना वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आक्रोश आणि संताप व्यक्त होत असून, विशेष म्हणजे मुलींच्या मातेकडे संशयाने पाहिले जात आहे. तिच्या वागणुकीबाबत सासरी असलेल्या मंडळींनी पोलिसांसमोर काही गंभीर बाबी उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी मुलींच्या आईला ताब्यात घेतले असून शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. ही घटना केवळ वैयक्तिक कौटुंबिक वादाचा भाग आहे की त्यामागे आणखी काही दडलेले आहे, हे तपासाअंती समोर येणार आहे. जिल्हाभर या प्रकरणाची तीव्र दखल घेतली जात असून, बालहक्कांचे उल्लंघन, कुटुंबातील अंतर्गत तणाव आणि सामाजिक असुरक्षितता यांचे एक वेदनादायक मिश्र दर्शन या घटनेतून पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे..


Comments are closed.