मार्कंडा–कंसोबा जंगलात वाघाचा वावर; वनविभागाचा सतर्कतेचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,२६ नोव्हेंबर: चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंसोबा वनपरिक्षेत्रातील जंगलात वाघाचा सक्रिय वावर असल्याची नोंद वनविभागाने केली असून परिसरातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाळीव जनावरे चराईसाठी जंगलात न नेताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोढाले यांनी केले आहे.
येनापूर, दुर्गापूर, मुधोली चक क्र. २, लक्ष्मणपूर, गोलकर मुधोली, जैरामपूर, रामपूर, कढोली, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, रायपूर, रामकृष्णपूर, बहादूरपूर, गुंडापल्ली, सुभाषग्राम, अडपल्ली, कोनसरी, कन्हाळगाव, रविंद्रपूर, धर्मपूर, सोमनपल्ली, आंबोली आणि वायगाव येथील ग्रामपंचायतींना वाघाच्या हालचालीबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासही वनविभागाने सांगितले आहे.
स्थानिक पोलिस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यक ती दक्षता घेण्यास सांगितले आहे. जंगल परिसरात कोणतीही अनोळखी हालचाल, प्राण्यांचे ठसे किंवा संशयास्पद आवाज आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करून विभागाने सांगितले की वाघाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
