Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन अकादमीत सिनेट तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांचे प्रशिक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांती :डॉ .विनायक देशपांडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 मे –  गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या प्रशिक्षणाचे एक दिवसीय शिबीर चंद्रपूर येथील वन अकादमीच्या “जिज्ञासा” सभागृहात मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार आणि नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. अनिल ठगे यांनी विविध सत्रांतून सिनेट सदस्यांना प्रशिक्षित केले.

नव्याने गठित सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याचे विद्यापीठ कायदा आणि नवे शैक्षणिक धोरण यासंदर्भात प्रशिक्षण व्हावे या हेतूने या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू
डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन व्यासपीठावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्या सत्रात डॉ. विनायक देशपांडे यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात कुलगुरूंचे अधिकार आणि कर्तव्य या विषयावर विस्तृत विवेचन केले. येत्या काळात बरेच मोठे बदल घडत आहेत. नवे शैक्षणिक धोरण दिशादर्शक ठरणार आहे. सोबतच तंत्रज्ञानही झपाट्याने वाढत आहे. येत्या १० वर्षांत ६५ टक्के नोकऱ्या आपोआप बाद होतील. त्यामुळे सृजनात्मक विचार आत्मसात करून मार्गक्रमण करणे गरजेचे ठरणार आहे.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांती आहे असेही ते म्हणाले.

‘विद्यापीठाशी संबंधित कायद्याचे राज्य’ या विषयावर डॉ. श्रीकांत कोमावार यांनी महत्त्वपूर्ण तथ्य मांडले. ‘रूल ऑफ लॉ’ला अनन्य साधारण महत्त्व असून, कायदे पाळणे हे जसे कुलगुरूंचे कर्तव्य आहे, तसेच सदस्यांचेही आहे. गोंडवाना विद्यापीठ हे सदस्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणारे महाराष्ट्रातील पहिलेच विद्यापीठ आहे असे ते म्हणाले. तर डॉ. अनिल ठगे यांनीही विविध कायद्याचा आधार देत सिनेट आणि अन्य प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तसेच अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सभेच्या कामकाजा विषयी जागरूक असायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. या शिबिराचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.