Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • वर्ग ३ कर्मचा-यांच्या विभागीय परिक्षांना तारीख पे तारीख.
  • एक दिवस अगोदर परीक्षेची तारीख बदलल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप.
  • परीक्षाच रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट आणि तातडीने वेतनवाढ द्या – CITU संलग्न शिक्षक संघटनेची मागणी.
  • गेल्या दहा वर्षापासून वर्ग-3 कर्मचारी बढती व वेतनवाढीच्या प्रतीक्षेत .

नाशिक, दि. १४ जून : आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा वर्ग ३च्या कर्मचा-यांना बसला आहे. वर्ग ३च्या कर्मचा-यांची १५ जून रोजी होणारी विभागीय परिक्षा अचानक एक दिवस अगोदर पुढे ढकलल्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी CITU संलग्न शिक्षक संघटनेने प्रशासनाचा तीव्र निषेध केला असून, सदर परीक्षाच रद्द करून या कर्मचाऱ्यांना सरसकट आणि तातडीने वेतनवाढ देण्याची मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेल्या वर्ग-3 कर्मचाऱ्यांना पुढील प्रमोशनसाठी विभागीय परीक्षा बंधनकारक आहे. सदरपरीक्षा पास न झाल्यास त्यांची परिक्षा पास होईपर्यंत वेतन वाढ स्थगित करण्यात येते. परंतु गेल्या दहा वर्षापासून आदिवासी विकास विभागाने ही विभागीय परिक्षाच घेतलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे सहा ते दहा वेतन वाढी रोखल्या गेल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर दिनांक १५ जून,२०२२ ते १७ जून, २०२२ या कालावधीत विभागीय परीक्षा घेण्याचे आदिवासी विकास विभागाचे नियोजन होते. या संदर्भात परिपत्रक देखील जारी करण्यात आले होते. नाशिक मधील महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या परीक्षेसाठी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, यवतमाळ, सोलापूर, अमरावती अशा विविध ठिकाणाहून परीक्षार्थी कर्मचारी नाशिकला मिळेल त्या वाहनाने परीक्षेसाठी निघाले होते.

परंतु परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परीक्षार्थींवर परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. या सर्व गोंधळाला आदिवासी विकास विभाग कारणीभूत असल्याचा आरोप करत, CITU संलग्न शिक्षक संघटनेने प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. तसेच सदर परीक्षा रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट आणि तातडीने वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच आतापर्यंत परीक्षा न घे घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना सोसावा लागलेला भुर्दंड शासनाने भरून द्यावा अशी मागणी देखील CITU संलग्न शिक्षक संघटनेने प्रशासनाला केली आहे.

Comments are closed.