मोटारसायकलवरून जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत.
₹९.१० लाखांचा मुद्देमाल जप्त.. विश्रामधाम नगरातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात दिनांक २१ एप्रिल रोजी विश्रामधाम नगर भागात दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकल आडवी टाकून एका नागरिकाचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹९,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत दोघांना अटक केली.
तक्रारदाराने वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे, ते आपल्या मित्रासह जात असताना दोन अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला आणि धमकावून त्यांच्या हातातील महागडा मोबाईल फोन आणि ₹९०,०००/- रोख रक्कम हिसकावून स्कॉर्पिओ (MH34X-0441) वाहनातून पलायन केले.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३९२, ३४ सह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीचा आधारावर व सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दोन आरोपींना ओळखून ताब्यात घेतले. आरोपींची नाव सोहेल शेख आणि आकाश बोरकर अशी असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ वाहन मिळून एकूण ₹९.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, अपर पोलीस अधीक्षक राजपाल, आणि उपविभागीय अधिकारी विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.