मुख्यमंत्री चे भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन कुटुंबियांची भेट
‘हात जोडून उभे राहिल्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते’, मुख्यमंत्री झाले भावुक
या घटनेच्या तपासात कुठेही कसर राहणार नाही.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा, 10 जानेवारी : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणी 10 नवजात बाळांच्या गुदमरुन मृत्यू झाल्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मृत बाळांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ‘त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिल्या खेरीस माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते’ अशी भावुक प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह दुर्घटनाग्रस्त भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेत मृत पावलेल्या 10 नवजात बाळांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केले.
भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये काय घडले याचा तपास पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. मी आता मृत बाळांच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याखेरीस कोणतेही शब्द माझ्याजवळ नव्हते. कारण सांत्वन करता येईल, एवढे शब्द माझ्याकडे नाही’ अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘या घटनेची चौकशी केली जाणार आहे. अपघात हा अचानक घडला आहे की आधी अहवाल देऊनही दुर्घटना घडली, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य कोरोना सारख्या संकटाचा सामना करत आहे. या काळात कोणत्या गोष्टीकडे डोळेझाक केली गेली आहे का? याच्या चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहे. सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी एक समिती तयार केली आहे. ती संपूर्ण चौकशी करणार आहे. विभागीय आयुक्तांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुठेही कसर राहणार नाही. जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.