भंडारा आगप्रकरणात सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा करुन तपासाचे आदेश दिले आहेत.
सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचं ऑडिट करा : उपमुख्यमंत्री
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 09 जानेवारी:– भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर यूनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा करुन तपासाचे आदेश दिले आहेत.
आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं.
इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरोप.
आगीची घटना घडली त्या शिशु केअर युनिटमच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून समस्या होती. वीजपुरवठा कमी जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही. मे 2020 पासून तर तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा असे पत्र दिले होते, मात्र, तरीही ऑडिट केलं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची.
भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील टोपे म्हणाले.
Comments are closed.